माय मराठी
माझ्या मराठीची गोडी
आहे अवीट अवीट
मुकुंदराज योगाने
पाया रचिलारे नीट
माझ्या मराठीचा रंग
असे गहिरा गहिरा
ज्ञानेशाच्या ज्ञानाईत
वाहे अमृताचा झरा
माझ्या मराठीचे बोल
किती वर्णू किती गावे
समर्थांच्या बोधातून
ज्ञान सकल हे घ्यावे
माय बोलीचे अभंग
ऐकताच होता दंग
एका तुका नेरे यात
उभा केला पांडुरंग
मराठीच्या या बहिणी
अहिराणी नि कोकणी
जीवनाचा सारिपाट
उलगडते बहिणी
युगे युगे येती जाती
मराठीचा जगी ठसा
पुढे पिढीला हो देऊ
अनमोल हा वारसा
करुणा कुलकर्णी बागले
सेलू